अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू!!!
पुणे जिल्हा प्रतिनिधीः गोविंद गव्हले
पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या चारवर्षीय चिमुकलीचा विवट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रक्षा अजय निकम असे या चिमुकलीचे नाव आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तिची आई दुसऱ्या मुलाला जेऊ घालण्यासाठी घरात गेली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकलीला उचलून उसाच्या शेतामध्ये ओढत नेले. आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्या लांब गेल्याने तिने आरडाओरडा केला. नागरिक व वनकर्मचाऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला. तब्बल दीड ते दोन तासांनी अर्धा किलोमीटर अंतरावर मुलीचा घड नसलेला मृतदेह व शीरआढळून आले. वन खात्याने मृतदेह ताब्यात घेऊनशवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठविला आहे.शिरूरच्या पूर्व भागात दोन महिन्यात मांडवगण फराटा येथे वंश सिंग व समाधान टेंभेकर या दोन लहान चिमुकल्यांना बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर ही पूर्व भागातील तिसरी घटना आहे. त्यात या लहान चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समाधान टेंभेकर या चिमुकल्याच्या मृत्यूच्या घटनेला महिना पूर्ण होत नाही तोच आता पुन्हा एकदा वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरम्यान, आणखी परिसरात अनुचित घटना घडली तर याला वनविभाग जबाबदार असेल, असे ग्रामपंचायत सदस्या कोमल कापरे यांनी सांगितले. या बिबट्याला पकडण्यासाठी तत्काळ वन विभागाने पिंजरे लावावे अशी मागणी सरपंच निर्मला फलके यांनी केली आहे.
